देशाचे पहिले महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस पथक स्वातंत्र्यदिनाला मोदींच्या सुरक्षेत

362

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – देशात पहिल्यांदाच महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस म्हणजेच SWAT कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ३६ महिलांचे हे पथक स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर तैनात असेल. तसेच इंडिया गेटवरही महिलांचे SWAT पथक तैनात असेल.

सुमारे १५ महिन्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर या पथकाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचा SWAT पथकात समावेश झाला आहे त्या सर्व ईशान्य भारतातील आहेत. देशातील तसेच परदेशातील तज्ज्ञांनी या पथकाला प्रशिक्षण दिले आहे. या महिला पथकाला बॉम्ब निकामी करणे, इमारतींवर चढणे आणि ओलिसांची सुटका करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकाने कालच (१० ऑगस्ट) आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

याआधी या पथकासाठी पुरुषांनाच प्राधान्य होते. महिला SWAT पथक बनवण्याआधी ३६ महिलांना १५ महिने कठोर प्रशिक्षण देण्यात आले. अत्याधुनिक शस्त्र चालवायला शिकवले. दहशतवाद्यांशी सामना करण्याच्या परिस्थितीबाबत सांगितले. क्राव्ह मागा या टेक्निकमध्ये पूर्णत: तरबेज झाल्यानंतर त्यांना ‘स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस’ पथकात सामील करण्यात आले. महिला कमांडोंचे हे पथक पुरुषांच्या सर्व पाच SWAT पथकांसोबत मिळून दिल्लीत काम करणार आहे.