देशाचा स्वातंत्र्यलढा मोठा आहे; ‘चले जाव’ म्हटल्याने इंग्रज गेले नाही- सुमित्रा महाजन

90

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – ‘देशाचा स्वातंत्र्यलढा मोठा आहे. महात्मा गांधीजींनी ‘चले जाव’ म्हटले आणइ इंग्रज गेले असे नाही. अहिंसेबरोबरच क्रांतिकारांनी आपल्या जिवाचे दिलेले बलिदान आणि १८५६ ते १९४७ हा कालावधी विसरून चालणार नाही,’ असे मत लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी रविवारी चिंचवड येथे व्यक्त केले.

क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण महाजन यांच्या हस्ते रविवार (८ जुलै) चिंचवड येथील चापेकरवाड्यात करण्यात आले. कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री गिरीष बापट, नितीन काळजे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, चापेकर बंधूंचे वंशज, विलास लांडगे, गजानन चिंचवडे आदी या वेळी उपस्थित होते.

चापेकरांसारख्या अनेक क्रांतिकारांनी देशासाठी आपले प्राण वेचले आहेत. अहिंसेच्या मार्गाने लढा दिला हे जरी खरे असले, तरी त्यापूर्वी गावागावातील स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा मोठा आहे. चापेकर बंधू आणि वीर सावरकरांसारखे योद्धे देशाला मिळाले आहेत. टपाल तिकिटाच्या माध्यमातून चापेकरांना वाहिलेली आदरांजली खरी असून, त्यामुळे त्यांचा इतिहास संपूर्ण देशभरात पोहोचणार आहे.’

गिरीश बापट म्हणाले, ‘देशाच्या इतिहासात चापेकर अजरामर आहेत. जेव्हा जेव्हा आपण चापेकरांचे तिकीट दिसेल तेव्हा तेव्हा त्यांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येईल. अनेकजण राजकीय तिकिटांच्या मागे असतात. पण अशा इतिहासाची आठवण करून देणाऱ्या टपाल तिकिटांच्या मागे फार कमीजण असतात.