देशांतर्गत विमानसेवा सोमवार पासून

59

नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) : डोमेस्टिक अर्थात देशांतर्गत प्रवासी विमान सेवा 25 मे 2020 पासून पुन्हा सुरु करण्याची घोषणा नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केली. पुढील तीन महिन्यांच्या काळासाठी विमान प्रवासाची नियमावली पुरी यांनी जाहीर केली. विमानातील प्रत्येक वर्गासाठी कमाल आणि किमान तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत. ‘कोरोना’ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून देशातील प्रवासी हवाई वाहतूक बंद आहे.

प्रत्येक प्रवाशाला सोबत एकच चेक-इन बॅग नेण्याची मुभा दिली आहे. उड्डाणाच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर रिपोर्ट करणे बंधनकारक असेल, असे पुरी यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना मास्क घालणे आणि सॅनिटायझरच्या बाटल्या घेऊन जाणे अनिवार्य आहे.
विमानात जेवण दिले जाणार नाही, केबिन क्रू पूर्णपणे संरक्षक वेशात असेल. विमानात मधली सीट रिकामी ठेवली जाणार नाही. सीट रिकामी ठेवल्याने शारीरिक अंतराचे पालन होते, असे नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेनेच प्रवासी वाहतूक होणार. अन्यथा प्रवाशांना अधिक तिकीट दर सोसावा लागेल, असं हरदीपसिंह पुरी यावेळी म्हणाले.

प्रत्येक वर्गासाठी कमाल आणि किमान भाडे निश्चित करण्यात आले आहे. देशातील सर्वाधिक व्यस्त मार्ग असलेल्या दिल्ली-मुंबई प्रवासाचे किमान भाडे 3 हजार 500 रुपये, तर कमाल भाडे 10 हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. दोन मेट्रो सिटी अंतर्गत वाहतूक 33 टक्के प्रमाणात सुरु होणार आहे.

WhatsAppShare