देशवासीयांच्या आरोग्य रक्षणासाठी अत्यंत साधेपणाने नववर्षाला सुरुवात करूया गुढीपाडवा साजरा करूया

271

 

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. उद्या चैत्रारंभ होत असून, २५ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो.

मात्र नववर्षाच्या स्वागतावर करोनाचे सावट असल्याने साहजिकच स्वागतयात्रांमध्ये उत्साहाने सहभागी होणारी मंडळी नाराज आहेत. आरोग्य महत्त्वाचे असल्याने स्वागतयात्रा याआधीच रद्द करण्यात आल्या होत्या. सोनेखरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र, या खरेदीसाठी यंदा बाहेर पडू नये असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

तसेच यंदाच्या वर्षी करोना विषाणूला पराभूत करण्याचा संकल्प करणे अत्यावश्यक आहे. करोनामुक्त भारतासाठी यंदा गुढी उभारूया. आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि देशवासीयांच्या आरोग्य रक्षणासाठी अत्यंत साधेपणाने नववर्षाला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे सकाळी अभ्यंगस्नान करावे. देवांच्या पूजेप्रमाणे अगदी साधेपणाने गुढीपूजन करावे. घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

दरम्यान, गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करून घ्यावी. घरीच असलेल्या काठीचा वापर गुढी उभारण्यासाठी करावा. यासाठी लागणारी साडी किंवा वस्त्र हे घरचेच वापरावे. घरातील ताब्यांवर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढावे. घराबाहेर छोटीशी रांगोळी काढावी. रांगोळी हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते.

‘घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा, देवाला साखरही पुरेल मात्र बाजारात गर्दी करू नका’, असे आवाहन त्यांनी केले आहे. याचप्रमाणे अगदी खूप काही गोडाधोडाचे करता आले नाही, तर गुळ-तूप, दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. आप्तेष्टांना, मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी घराबाहेर न पडता सोशल मीडियाचा वापर करू शकता.

WhatsAppShare