देवदर्शनाहून घरी निघालेल्या वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

61

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिराकडून दर्शन घेऊन घरी निघालेल्या एका साठ वर्षीय वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना 26 जून रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आळंदी येथे घडली.

पंडित आबासाहेब ढवळे (वय 60) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत रंजीत पंडितराव ढवळे (वय 27, रा. केळगाव रोड, आळंदी) यांनी गुरुवारी (दि. 22) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एम एच 14 / 3123 – पूर्ण नंबर माहिती नाही) वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील पंडितराव हे 26 जून रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिराकडून दर्शन घेऊन घरी जात होते. रस्त्याच्या कडेने पायी चालत जात असताना आरोपी दुचाकीस्वाराने दुचाकीने पंडितराव या यांना जोरात धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती न देता दुचाकीस्वार पळून गेला. त्यानंतर फिर्यादी यांचे जखमी वडील पंडितराव यांचा मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare