दूध आंदोलन आणखी चिघळणार

45

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्यात सुरू झालेल्या दूध बंद आंदोलनामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथून पुणे, मुंबईकडे निघालेले दुधाचे टँकर, तसेच पॅकिंग दुधाच्या गाड्या अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतले. पुण्यात दुधाच्या पाच गाड्या फोडल्या. असे असले तरी मुंबईत येणाऱ्या दुधावर पुढील तीन दिवस तरी परिणाम होण्याची शक्यता नसल्याने मुंबईकरांना तोवर दिलासा मिळू शकतो. दरम्यान, दूध आंदोलनाचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले.

कर्नाटकच्या धर्तीवर दुधाला लिटरमागे प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तर, थेट अनुदानास नकार देतानाच सहकारी दूध संघच शेतकऱ्यांना लुटत आहेत, असा गंभीर आरोप सरकारच्यावतीने करण्यात आला. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारची भूमिका स्पष्ट नाही, राज्य सरकार या मुद्यावर गंभीर नाही, असा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. आंदोलक आणि सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने दूध आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.