‘दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

103

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : राज्यातील काही भागात झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पूर आणि नैसर्गिक संकटांमुळे प्रचंड मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर रायगड, साताऱ्यात तर मृत्यूचं तांडव बघायला मिळालं. यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या दुःख घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाचं भूमिपूजनही रद्द करण्यात आलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलची माहिती दिली.

वरळी येथील बीडीडी चाळवासीयांच्या थेट पुनर्वसनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र, राज्यात दरड कोसळून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर २७ जुलै रोजी होणार भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. “कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे २७ जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल. दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३२ घरं गाडली गेली. तर इतर घरांचंही नुकसान झालं. अवघं गावचं उद्ध्वस्त झालं असून, हे गाव पुन्हा वसवण्याचं काम म्हाडाकडून केलं जाणार आहे. गावात उभारण्यात येणाऱ्या घरांची रेखाचित्र ट्वीट करत आव्हाड यांनी याची माहिती दिली. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमांची माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी याची इतिहासात नोंद होईल असं म्हटलं होतं. “बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच मुंबईकरांच स्वप्न… २७ जुलै रोजी पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ! मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित… इतिहासात नोंद होईल”, अशा भावना आव्हाड यांनी भूमिपूजन कार्यक्रमांची माहिती देताना व्यक्त केल्या होत्या.

WhatsAppShare