दुष्काळाने केले गुन्हेगार; शेतात पाईप टाकण्यासाठी त्यांनी चोरला पाईपने भरलेला ट्रक

168

चाकण, दि. ११ (पीसीबी) – दुष्काळामुळे शेतात पाण्यासाठी पाईप टाकून तसेच उरलेले पाईप विकून पैसे कमवण्यासाठी तिघाजणांनी मिळून पाईपांनी भरलेला ट्रकच चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट १ आणि चाकण पोलिसांनी केलेल्या समांतर तपासात तीन तरुणांना अटक करुन त्यांच्याकडून ट्रक आणि ९०० पाईप असा एकूण ११ लाख २९ हजार ५१२ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

समाधान त्रिंबक दौंड (वय २३, रा. गणेशनगर, येरवडा), अमोल विक्रम मोरे (वय २०, रा. गणेशनगर, येरवडा), आणि संदीप राजेंद्र मोरे (वय २८, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे आरोपी हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गावाकडे दुष्काळ असल्याने ते पुण्यात कामाच्या शोधात आले होते. तसेच त्यांना शेतात पाईपलाईन करायची होती. यासाठी तिघांनी मिळून पाईपने भरलेला ट्रक चोरण्याचे ठरवले. संदीप मोरे सध्या शेलपिंपळगाव येथे शिक्रापूर रोडवर राहतो. त्याच्या घरासमोर अनेक वाहने थांबतात.

गुरुवार (दि.६ जून) रोजी तिघांनी मिळून फिनोलेक्स पाईपने भरलेला ट्रक चोरण्याचा कट रचला. टेम्पोवर भास्कर श्रीपतराव लांडगे हे चालक होते. तिन्ही आरोपींनी रात्री पावणेबाराच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर ट्रक अडवला तसेच आम्ही फायनान्सचे लोक आहोत, तुमच्या गाडीचा हप्ता थकलेला आहे, असे सांगून दोघांनी भास्कर यांना त्यांच्या दुचाकीवरुन दिघीला नेले. तर तिसऱ्या आरोपीने पाइपने भरलेला ट्रक सरळ उस्मानाबाद येथील त्यांच्या गावी नेला. ट्रकचालक भास्कर यांना दोघांनी दिघी येथे सोडले. त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतला. याबाबत भास्कर यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

चाकण पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट एकचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना या गुन्ह्यातील संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार येरवडा बीडी चाळ भागात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पाइपने भरलेला ट्रक त्यांच्या मूळ गावी येरमाळा आणि वाशी येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा व दळवेवाडी येथे जाऊन ट्रक आणि त्यामधील नऊशे फिनोलेक्स पाईप असा एकूण ११ लाख २९ हजार ५१२ रुपयांचा ऐवज जप्त केला. चोरलेल्या पाईपपैकी काही पाईप आरोपी त्यांच्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी वापरणार होते. तर राहिलेले पाईप आणि ट्रक विकणार होते. मात्र पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, राजेंद्र शेटे, अमित गायकवाड, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सचिन मोरे, सूनील चौधरी, प्रमोद केळकर यांच्या पथकाने केली.