दुर्देवी: अंगावर भिंत कोसळुन २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

124

वाशिम, दि. १५ (पीसीबी) – अंगावर भिंत कोसळुन एका २ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना वाशिम जिल्ह्यातील धार पिंप्री येथे घडली.

वृषाली योगेश डाखोरे (वय २, रा. धार पिंप्री, ता. मालेगाव जि. वाशिम) असे मृत मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश डाखोरे त्यांची पत्नी दिपाली मुलगा कृष्णा (वय ४) आणि मुलगी वृषाली यांना सोबत घेऊन माहेरी राजुरा येथे जाण्याकरिता निघाल्या होत्या. यावेळी घराचा दरवाजा लावण्याकरीता दरवाजा ओढला असता अचानकपणे दरवाज्यासमोरची भिंत अंगावर येऊन कोसळली. यामध्ये तिन्ही मायलेक जखमी झाले. यात २ वर्षीय वृषाली गंभीर जखमी झाल्याने तिला तत्काळ मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर मुलगा कृष्णा आणि त्याची आई दिपाली हे जखमी झाले. या घटनेमुळे धारपिंप्री गावावर शोककळा पसरली असून दोन वर्षे चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.