दुचाकी अडविल्याने महिलेने घेतला महिला वाहतुक पोलीसाच्या हाताचा चावा

39

पुणे, दि. २७ (पीसीबी) –  सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने दुचाकीवरील महिलेने वाहतुक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा करकचून चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या महावीर चौकात घडली.

सुरेखा साबळे असे चावा घेतल्याने जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी वानवडी येथील  एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलिस कर्मचारी साबळे या  सोमवारी (दि.२५) सायंकाळी सहाच्या सुमारास कॅम्पमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या़. यावेळी दुचाकीवरील ३० वर्षीय एका महिलेने सिग्नल तोडल्याने त्यांनी तिला थांबविले़. त्यामुळे रागावलेल्या महिलेने साबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी साबळे यांच्या मदतीला एक महिला पोलीस कर्मचारी तेथे आल्या. त्यांनीही संबंधित महिलेला थांबविण्याचा प्रयत्न केला़. मात्र  रागावलेल्य  महिलेने साबळे यांच्या हाताचा करकचून चावा घेऊन तेथून दुचाकीसह फरार झाली.  लष्कर पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला असून तीचा शोध घेत आहेत.