दुचाकीस्वारावर कारवाई केल्याने पोलिसाच्या डोळ्यात टाकली मिरचीची पूड

162

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई केल्याने एका वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज नाक्याजवळ घडली.

समीउल्ला भालदार असे डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज नाक्याजवळ ड्यूटीवर असलेले समीउल्ला भालदार यांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवले. दुचाकीवर तिघे बसले होते. कारवाईसाठी थांबवल्याने दुचाकीस्वारांना त्याचा राग आला. त्यातील एकाने त्याच्याकडील मिरचीपूड भालदार यांच्या डोळ्यात फेकून तिघेही पसार झाले. यानंतर सहकाऱ्यांनी समीउल्ला भालदार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डोळ्यात मिरची पूड गेल्याने भालदार यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. साकीनाका टेलिफोन एक्स्चेंजजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने आणि अंधार असल्याने आरोपींचा शोध घेणे कठीण जात होते. मात्र आरोपींच्या हातातील लाल रंगाच्या रुमालावरुन आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अब्दुल शेख आणि सद्दाम शेख या दोघांना अटक केली आहे.