दुचाकीस्वाराला मारहाण केल्या प्रकरणी विश्रामबाग वाहतूक विभागातील दोन पोलिस निलंबीत

382

पुणे, दि. १६ (पीसीबी) – हेल्मेट नसल्याच्या नावाखाली एका दुचाकीस्वाराकडे  हजार रुपयांची मागणी करत, संभाजी पोलिस चौकीत नेऊन मारहाण केल्या प्रकरणी विश्रामबाग वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई वाहतूक उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी केली.

हवालदार सुनील ज्ञानदेव डगळे व पोलिस नाईक नीलेश रावसाहेब काळे असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहे. याप्रकरणी कृष्णा देवराव काळे (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, म्हात्रे रोड) यांनी तक्रार केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार डगळे आणि पोलिस नाईक काळे हे दोघेही सोमवारी विश्रामबाग वाहतूक विभागाच्या हद्दीत हेल्मेट सक्‍तीची कारवाई करत होते. त्यावेळी या दोघांनी मेसमधून जेवण करून विनाहेल्मेट आपल्या रूमकडे निघालेल्या कृष्णा काळे यांना अलका टॉकीज चौकात अडवले. त्यानंतर त्यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी करून, त्यांचा वाहन परवाना आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर कारवाई न करता त्यांना सोडून दिले.  तक्रारदार हे काही वेळातच त्यांच्याकडे असलेले हेल्मेट घेऊन पोलिसांकडे आले. माझ्याकडे हेल्मेट असून माझा वाहन परवाना मला परत द्या, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. यावेळी त्यांच्यात व पोलिसांत शाब्दिक चकमकदेखील झाली.

त्यानंतर तक्रारदार त्या ठिकाणाहून बाजूला गेले व काही अंतरावरून वाहतूक पोलिसांचे फोटो घेतले व शूटिंग केले. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांना धक्‍काबुक्‍की करत, पकडून संभाजी पोलिस चौकीला आणले. या दोघा कर्मचार्‍यांनी तक्रारदारांना चौकीत मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईलमधील सिमकार्ड व मेमरी कार्ड काढून घेतले. एवढ्यावर हे दोन्ही वाहतूक पोलिस थांबले नाहीत. हेल्मेट कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी या दोघांनी एका पोलिसासोबत तक्रारदाराला टिळक चौकात पाठवले व त्या ठिकाणी गाडीवर बसवून त्यांचे फोटो काढून त्यांच्यावर विनाहेल्मेटची कारवाई केली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोन्ही पोलिसांना वाहतूक उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी निलंबित केले आहे.

WhatsAppShare