दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन मोबईल फोन पळवले

16

भोसरी,दि.२५(पीसीबी) – दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पादचारी व्यक्तींचे दोन मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत गुरुवारी (दि. 24) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत उर्मिला रामदास काळे (वय 29, रा. भोसरी गावठाण) यांनी दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी काळे 6 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास नोकरीवर जात होत्या. भोसरी येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पीएमटी बस थांब्यावर उभे राहून त्या त्यांच्या बसच्या चालकाला फोन करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातून त्यांचा सात हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.

दुस-या घटनेत अंकुर रामनिवास अगरवाल (वय 24, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अगरवाल यांचे वडील रामनिवास आणि आई राधा हे दोघेजण 5 जुलै रोजी सकाळी सहा वाजता चालण्यासाठी जात होते. ते दिघीरोड भोसरी येथील संडविक कॉलनी चौकात आले असता दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांच्या हातातून आठ हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. वरील दोन दोन्ही गुन्ह्याचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

WhatsAppShare