दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे एक ह्दयस्‍पर्शी उपक्रम – मुख्यमंत्री फडणवीस

111

पुणे,  दि. २३ (पीसीबी) – क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्‍हीटी फीटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्या करियरला त्यामुळे  एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन हा एक हृदयस्पर्शी उपक्रम आहे,  असे  गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे काढले.

बिबवेवाडी परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  ग्रॅव्हिटी फिटनेस  क्लबच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील २१ दिव्यांग व्यक्‍ती दत्तक घेण्यात आल्या असून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल  निकम,  माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,  सुधीर कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मिहीर कुलकर्णी, संजय मोरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की,  व्यक्ती शरीराने दिव्यांग नसतो,  तो मनाने असतो.  तो मनाने दिव्यांग होतो तेव्हाच खरा दिव्यांग असतो.  मनात उमेद, उभारी, हिंमत, ताकद असली, तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात. स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानात जाण्याचा सल्ला  होता.

मातृभूमीलाही चांगले मन व चांगले शरीर असलेली तरुणाई आवडते. ग्रॅव्हिटी क्लबने दिव्यांगाना आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेला क्लब  खुला केला असून त्याचा फायदा होईल आणि नवीन खेळाडूंची टीम तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मिहिर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.  माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,  इंडियन बॉडी बिल्‍डींग अॅण्‍ड फीटनेस असोसिएशनचे संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात योगेश मेहेर, प्रतीक मोहिते, सुनील मुलाह, अक्षय शेजवळ, सूर्यकांत दुगावले, जय भवर, अमोल कचरे, नवनाथ भोगडे, प्रियंका कुदळे, रवी वाघ या दिव्‍यांग खेळाडूंचा सत्‍कार करण्‍यात आला.