दिव्यांगांना महापालिकेच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दिनेश यादवांचा पुढाकार

64

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांग नागरिकांसाठी अपंग पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आमदार महेश लांडगे युवा मंच आणि प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने चिखली परिसरातील २० दिव्यांगांना पेन्शन योजनेचे अर्ज भरून देण्यात आले. त्या अर्जाची पोहोच आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संबंधित दिव्यांग अर्जदारांना देण्यात आले. 

महापालिकेने शहरातील दिव्यांग नागरिकांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्याची योजना सुरू केली आहे. त्याला पंडित दिनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजना असे नाव देण्यात आले आहे. दिव्यांगांना पेन्शन देणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. या योजनेचा चिखली व कुदळवाडी भागातील सर्वच दिव्यांगांना लाभ मिळावा, यासाठी आमदार महेश लांडगे युवा मंच आणि प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पुढाकार घेतला.

त्यानुसार दिनेश यादव यांनी चिखली व कुदळवाडी परिसरातील दिव्यांगांना या योजनेचे अर्ज भरून देण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत या योजनेसाठी २० दिव्यांगांचे अर्ज भरण्यात आले आहेत. या अर्जदार दिव्यांगांना आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पोहोच देण्यात आली. चिखली, कुदळवाडीसह शहराच्या कोणत्याही भागातील दिव्यांगांनी महापालिकेच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे. यावेळी तुकाराम बढे, किशोर लोंढे, श्याम थोरात, रोहित जगताप आदी उपस्थित होते.