दिल्लीत शनिवारपासून भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन दिवसीय अधिवेशन

79

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) –  भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन दिवसीय अधिवेशन ८ आणि ९ सप्टेंबरला दिल्लीत होत आहे. अॅट्रॉसिटी कायदा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ,  राजस्थान या राज्यांच्या निवडणुका आणि २०१९ ची लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विचारमंथन करण्यात येण्याची शक्यता आहे.  

दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हे अधिवेशन होत आहे. आधी  भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक एनडीएमसीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होत असे.  मात्र, यावेळी आंबेडकरांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या वास्तूत हे अधिवेशन  होत आहे. हे अधिवेशन ऑगस्ट महिन्यातच नियोजित होते.  मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे ते लांबणीवर टाकण्यात आले.

अॅट्रोसिटी कायद्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सवर्णांशी संवाद साधण्याची रणनीतीही भाजपने आखली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यादृष्टीने आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे काय मुद्दे समोर येतात याकडे सर्वांचे  लक्ष असेल. या कार्यकारिणीसाठी भाजपचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत हजर  राहणार आहेत.