दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये मराठा समाजाच्या वतीने मोर्चा

116

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – मराठा आंदोलनाचा हुंकार आता राजधानी दिल्लीतही दुमदुमला. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (गुरूवार) राजधानी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सदनामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित होते.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत स्थायिक झालेले मराठा बांधव एकवटले होते. आंदोलन हिंसेच्या नव्हे तर सामोपचाराच्या मार्गाने करण्यात यावे, मात्र सरकारने आता आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात आजही आंदोलने करण्यात आली. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग कुडाळ येथे रोखून धरला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.