दिल्लीत ममता बॅनर्जींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

113

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (मंगळवार) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान, ममता बॅनर्जी अडवाणी यांच्या पाया देखील पडल्या. यावेळी ममता आणि अडवाणी यांच्यात देशातील राजकीय विषयावर १५ मिनिटे चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले.  

या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी अडवाणींना मागील अनेक वर्षांपासून ओळखते. आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. एनआरसीची सत्यता पडताळण्यासाठी एक पथक आसामला पाठवावे, अशी विनंती यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना केल्याचे अडवाणींनी मला सांगितले.

दरम्यान यावेळी ममता बॅनर्जी यांनी सपा खासदार जया बच्चन, काँग्रेस खासदार अहमद पटेल, शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांची देखील भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा केली. तर आज संध्याकाळी ममता बॅनर्जी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहेत.