दिल्लीत फोटोवाला खासदार आणि गल्लीत प्रसिद्धीसाठी बैठकांचा जोर; आमदार जगताप यांचे खासदार बारणे यांच्यावर टिकास्त्र

86

पिंपरी, दि. २८ (दि. २८) – शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरूवात करण्याचे आवाहन केले होते. परंतु, दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात “फोटो काढणारा खासदार” म्हणून ओळख असलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे या आवाहनामुळे प्रचंड चिडल्याचे दिसत आहे. आम्ही चांगल्या कामासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी “फोटोवाल्या खासदारा”ने चांगल्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची पुरेपूर संधी साधली आहे. महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय पात्रता असलेल्या बारणे यांना दिल्लीपेक्षा गल्लीतच जास्त रस असल्याचे त्यावरून सिद्ध होते, अशी घणाघाती टिका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.