दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शाह हेच जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

111

नवी दिल्ली,दि.२६(पीसीबी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली.

रविवारी हिंसा घडत होती तेव्हा केंद्रीय गृहमंत्री कुठे होते?, दिल्लीचे मुख्यमंत्री काय करत होते?, हिंसाचार वाढल्यानंतर निमलष्करी दलांना का पाचारण केलं नाही?, असं म्हणत सोनिया गांधी यांनी अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.