दिर्घायुषी जगलेल्या अलिमिहान सेयती यांचे निधन; वयाच्या 135 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

292

पुणे, दि.1९ (पीसीबी) : दीर्घायुष्याचे वरदान मिळालेल्या आणि चीनमधील सर्वात वृद्ध महिला म्हणून गणल्या गेलेल्या अलीमिहान सेयती यांचे गुरूवारी निधन झाले. मृत्यूसमयी सेयती 135 वर्षांच्या होत्या. शिनजियांग उईघुर स्वायत्त प्रदेशात राहणाऱ्या सेयती यांच्या निधनाचे वृत्त अधिकृत असल्याची पुष्टी स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

‘चायना असोसिएशन ऑफ जेरोन्टोलॉजी अँड जेरियाट्रिक्स’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2013 मध्ये देशातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या यादीत सेयती अव्वल स्थानी होत्या.

अलीमिहान सेयती यांचा जन्म 25 जून 1886 रोजी झाला. काशगर प्रांतातील शुले परगण्यातील कॉम्क्सरिक टाउनशिपमधील मध्ये त्या राहत होत्या. त्यांचा नित्यक्रम सहज, सुलभ असे. त्यामध्ये वेळेवर जेवण, घरातील अंगणात सूर्यस्नानाचा आनंद घेणे अशा अनेक सवयींनी त्यांना आतापर्यंत शारीरिकदृष्या कणखर ठेवले. अगदी मरेपर्यंत त्या कुणाच्याही मदतीशिवाय फिरणे पसंत करीत होत्या. त्यांना त्यांच्या या दीर्घायुषाचे रहस्य विचारले असता तेथील संस्कृती आणि वातावरण हे मुख्य कारण असल्याचे त्या सांगत.

दरम्यान, आरोग्य सेवेचे बदलते स्वरूप आणि उपलब्धता यासुद्धा गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने कंत्राटी डॉक्टर सेवा, मोफत वार्षिक शारीरिक तपासणी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी मासिक प्रगत-वय अनुदान या गोष्टींना प्राधान्य दिले आहे, त्यामुळे तेथील राहणाऱ्यांची वयोमर्यादा जास्त पहावयास मिळते आणि याच कारणामुळे की काय चीनमधील कोमक्सरिक शहर “दीर्घायुष्याचे शहर” म्हणून ओळखलं जातं.