दिघी, सांगवीत बाल लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना

109

दिघी, दि. २१ (पीसीबी) – अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिघी आणि सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 20) बाललैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी सुरेश रामराव एकाळे उर्फ बबलू (वय 28, रा. गणेश नगर,दिघी) याला अटक केली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवार (दि. 17) रात्री नऊ ते रविवारी (दि. 19) रात्री साडेअकरा वाजताच्या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला त्याचा मोबाईल क्रमांक देऊन त्याला फोन करण्यास सांगितले. आरोपीने अन्य एका महिलेकडे फिर्यादी यांच्या मुलीबाबत चौकशी केली. फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी जोतिबा तुळशीराम झुमके (वय 19, रा. पिंपळेगुरव) याला अटक केली आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 20) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी चायनीज आणण्यासाठी सोमवारी रात्री बाहेर गेली होती. त्यावेळी आरोपी जोतिबा याने दुचाकीवरून येऊन शिवीगाळ करत धमकी दिली. यापूर्वी देखील आरोपीने पीडित मुलगी चालत जात असताना तिच्याकडे पाहून शिवीगाळ, अश्लील चाळे तसेच पाठलाग केला होता. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.