दिघीत मातीचा ढिगारा अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू

48

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – दिघी येथील चोवीसावाडी येथे रस्त्यावर चेंबर टाकण्याचे काम सुरू असताना मातीचा ढिगारी अंगावर पडल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

मनोज कुमारा रावत (वय २५, रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर बाळू नामदेव भिंगारदिवे (वय २५) हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोवीसवाडी येथे ड्रेनेजचे काम सुरू आहे. दोन्ही कामगार १५ फूट खोल ड्रेनेजमध्ये काम करत होते. ड्रेनेजचे काम सुरू असताना जेसीबीच्या सहाय्याने खड्यातील माती काढून शेजारी टाकण्यात आली होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने ड्रेनेजच्या शेजारच्या मातीचा ढिगारा खड्यात कोसळला. यावेळी खड्यामध्ये काम करत असणारे मनोज आणि बाळू मातीच्या ढिगाऱ्याखाली आडकले. यामध्ये मनोज रावत याचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. तर बाळू भिंगारदिवे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, बाळू यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिघी पोलिस तपास करत आहेत.