दिघीत घरासमोरील मुरुम काढण्यास सांगितल्याने एकाच्या बरगड्या मोडल्या

320

दिघी, दि. ६ (पीसीबी) – घरासमोर टाकलेल्या मुरुमामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होत असल्याने तो उचलण्‌यास सांगितल्याच्या रागातून एकाला जबर मारहाण करुन त्याच्या बरगड्या फ्रॅकचर करण्यात आल्या. ही घटना रविवारी (दि.२) दुपारी दोनच्या सुमारास चऱ्होली मधील ताजणे मळा येथे घडली.

भिकाजी जिवबा टिपुगडे (वय ३८, रा. सिद्धिविनायक नगर, ताजणे मळा, चऱ्होली) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिघी पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार, भीमराव हृषीकेश बारकूल (रा. सिद्धिविनायक नगर, ताजणे मळा, चऱ्होली) आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिकाजी टिपुगडे यांच्या घरासमोर भीमराव यांनी काही दिवसांपूर्वी मुरुम टाकला होता. यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत होता. यावर भिकाजी यांनी भीमराव यांच्या नातेवाईकांजवळ तो मुरुम काढण्यास सांगितल्याचा निरोप दिला. हि बाब नातेवाईकांनी भीमराव यांना सांगितली. रविवारी दुपारी भिकाजी हे त्यांच्या पत्नीसोबत दुचाकीवरुन जात होते. यावेळी भीमराव आणि त्यांच्या पत्नीने भिकाजी यांच्यावर हल्ला चडवून छातीवर जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या छातीच्या दोन बरगड्या फ्रॅकचर झाल्या आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिघी पोलिस तपास करत आहेत.