दिघीत एचपीसीएल कंपनीच्या पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न; आरोपी फरार

257

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – दिघीतील वडमुखवाडी येथील सर्जा हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या एचपीसीएल या कंपनीच्या पाच फूट खोलातील पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. ही घटना रविवारी रात्री उशीरा पावने एक ते दोनच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी चार अनोळखी इसमांविरोधात एचपीसीएल कंपनीच्या परिचालन अधिकारी ब्रिजेश मिना यांनी दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चारही आरोपी फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा पावने एक ते दोनच्या दरम्यान चार अनोळखी चोरट्यांनी दिघीतील वडमुखवाडी येथील सर्जा हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या एचपीसीएल या कंपनीच्या पाच फूट खोलातील पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न. ही बाब कंपनीच्या कंट्रोल रुमला कळाली आणि त्यांनी याची माहिती गस्तीवर असलेल्या दिघी पोलिसांना दिली. दिघी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता चारही आरोपी तेथून फरार झाले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून एक खोरे, प्लॅस्टिकचे घमेले, टिकाऊ, दोन सिमेंटच्या मोकळ्यात पिशव्या हस्तगत केल्या आहेत. तसेच त्या ठिकाणी दोन फुट लांब आणि दोन फुट खोल खड्डा केलेला ही पोलिसांना आढळून आला. यामुळे दिघी पोलिस ठाण्यात चार अनोळखी इमांविरोधात तेल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.एम.गिरी तपास करत आहेत.