दिघीत अपहरण झालेल्या व्यक्तीची सोलापूर जिल्ह्यातून सुटका

42

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – दिघी येथील भारतमाता नगर येथून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले होते. दिघी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून सुटका करत आरोपीना अटक केली आहे.

सिद्धेश्वर शिंदे (वय 38, रा. गणेशनगर, पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दौलत हसनभाई नदाफ (वय 36, रा. शिवनगरी कॉलणी, आदर्शनगर, दिघी) असे सुटका केलेल्या अपहृत व्यक्तीचे नाव आहे. सत्यनारायण दत्तात्रय गवळी (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 24) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास दौलत नदाफ हे दुचाकीवरून भोसरीकडून दिघीकडे जात होते. ते भारतमाता नगर, बुद्धविहार दिघी येथे आले असता आरोपी सिद्धेश्वर आणि त्याच्या साथीदार स्कोर्पिओ कारमधून आले. त्यांनी दौलत नदाफ यांचे अपहरण केले.

याबाबत फिर्यादी सत्यनारायण यांना नदाफ यांच्या कर्नाटक येथे गेलेल्या भावाने फोन करून सांगितले. सत्यनारायण यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता तिथे नदाफ यांची दुचाकी पडलेली आढळून आली. त्यामुळे सत्यनारायण यांनी तत्काळ दिघी पोलिसात गुन्हा नोंदवला. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला. सुरुवातीला आरोपी पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात असल्याचे निदर्शनास आले. मात्र आरोपींनी नदाफ यांचा मोबईल फोन वाकड येथे ठेऊन आरोपी त्याद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असल्याचे समजले. तसेच आरोपी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे असल्याचीही पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी करमाळा येथून ओरोपी सिद्धेश्वर आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळून नदाफ यांची सुटका केली.

WhatsAppShare