दारू पिताना कानशिलात लगावली म्हणून ‘त्या’ तरुणाचा खून, गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या मुलासह दोघांना अटक

1375

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – दारू पिताना झालेल्या भांडणातून तरुणाने दिवंगत गोल्डमन दत्ता फुगे यांच्या मुलाच्या कानशिलात लगावली. त्यावरून ‘तू आमच्या भाईला का मारले’, असे म्हणून तरुणाचा शस्त्राने वार करून खून केला. याप्रकरणी गोल्डमॅन फुगे यांच्या मुलासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

शुभम दत्ता फुगे (वय 26, रा. भोसरी), प्रथमेश वायकर (वय 19), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सुरेश डांगळे (वय 27, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय 25) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन डांगळे हा रात्री घराबाहेर पडला. त्यानंतर तो आरोपींसोबत शुभम फुगे याच्या घराच्या टेरेसवर दारू प्यायला बसला. दारू पित असताना मयत अमन आणि आरोपी शुभम यांच्यात वाद झाला. त्यावेळी अमनने शुभमच्या कानशिलात लगावली.

या कारणावरून आरोपींनी ‘आमच्या भाईला का मारले’, असे म्हणून अमन यांना भोसरी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ नेले. तेथे आरोपींनी अमन डांगळे यांच्यावर कोयत्याने वार केले. यात डांगळे यांचा मृत्यू झाला.

सोमवारी (दि. 26) सकाळी भोसरी गावात विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ त्याचा मृतदेह आढळला. या गुन्ह्याचा तपास करताना भोसरी पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. सराईत गुन्हेगार शुभम फुगे हा पलायन करण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुभम याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार प्रथमेश वायकर व विधीसंघर्षीत बालक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे आरोपी शुभम याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वायकर आणि विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले. आरोपी शुभम याच्या विरोधात यापूर्वी तीन तर विधीसंघर्षीत बालकाच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

WhatsAppShare