दारुड्या लेकाची आईने कुऱ्हाडीचा घाव घालून केली हत्या

674

मुंबई, दि. २ (पीसीबी) – लेकाच्या दारुच्या व्यसनाला आणि पैसे मागण्याला कंटाळून आईने लेकावर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. ही घटना सोमवार (दि.३० जुलै) रात्री नऊच्या सुमारास नालासोपाऱ्यात घडली.

संतोष (वय २७, रा. नालासोपारा) असे हत्या झालेल्या दारुड्या लेकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याची आई जया यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आपली आई जया आणि वडिल बलराम यांच्यासोबत नालासोपारा येथे राहत होता. त्याला दारुचे प्रचंड व्यसन होते. संतोष हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. संतोषची पत्नी त्याला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी आपल्या नवजात बाळासोबत घर सोडून निघून गेली होती. संतोषची आई जया घरकाम करायची. तो तिला पैशांसाठी नेहमी त्रास देत होता. सोमवारी रात्री ९ वाजता संतोषने दारुसाठी पैसे मिळावेत यासाठी आई जया यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी पैसे देण्यासाठी नकार दिल्यानंतर संतोष कुऱ्हाड घेऊन त्यांच्या अंगावर धावत आला. यावेळी जया यांनी कुऱ्हाड त्याच्या हातातून खेचून घेत त्याच्यावर घाव घातला. यामध्ये संतोषचा जागीच मृत्यू झाला. बलराम त्यावेळी घरात उपस्थित होते. त्यांनी शेजाऱ्यांकडे धाव घेत मदत मागितली. पोलीस पोहोचले तेव्हा जया मुलाच्या मृतदेहाशेजारीच बसल्या होत्या. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.