दाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन

109

पुणे, दि. २० (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाली. त्यांचा मारेकरी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकाला अटक केली असली तरी खऱ्या सूत्रधारापर्यंत अजूनही पोलीस पोहोचलेले नाहीत. दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ, त्यांच्या स्मृतिदिनी ‘जवाब दो’ या मोर्च्याचं आयोजन अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे, मुंबई आणि अन्य ठिकाणी केले आहे.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांची हत्या झाली. या ठिकाणी दरवर्षी अंनिसचे कार्यकर्ते एकत्र जमतात. सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या, अनिष्ट रुढी, अंधश्रद्धांविरोधात चळवळ उभी करणाऱ्या डॉ. दाभोलकरांच्या विवेकी विचारांची हत्या करू पाहणाऱ्या या वृत्तीचा छडा पोलीस कधी लावणार, असा प्रश्न हे कार्यकर्ते या आंदोलनाच्या माध्यमातून गेली पाच वर्षे विचारत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांसह अतुल पेठे, सोनाली कुलकर्णी असे सेलिब्रिटीही या आंदोलनात सक्रीय आहेत. दाभोलकरांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर, मुलगी मुक्ता दाभोलकर, बाबा आढाव, मेधा पानसरे आदिंनी आज सकाळी ओंकारेश्वर पुलावर दाभोलकरांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथून हा मोर्चा निघाला. ओंकारेश्वर पूल ते सानेगुरुजी स्मारक असा हा मोर्चा निघणार आहे.