दाभोलकर-पानसरे हत्येशी संबंध आहे का याची तपासणी

197

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – गावठी बॉम्ब व बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आढळल्यामुळे नालासोपारा येथून वैभव राऊत याला दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. नालासोपारा आणि पुण्यातून एकूण तीन जणांना अटक केली आहे. त्या तिघांचा ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध आहे काय हेदेखील तपासून पाहण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात शुक्रवारी पत्रकारांना दिली आहे.

वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील नालासोपारा येथून अटक करण्यात आलेला वैभव राऊत याचा सनातन संस्थेशी संबंध आहे काय असा प्रश्न विचारता केसरकर म्हणाले की, पोलिसांनी अद्याप कोणत्याही संस्थेचे नाव घेतलेले नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यावर भाष्य अथवा वक्तव्य करणे योग्य नाही. तपासाअंती सर्व बाबी स्पष्ट होतील, असे केसरकर म्हणाले.

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचा दाभोलकर, पानसरे हत्याकांडाशी संबंध आहे काय या प्रश्नावर केसरकर म्हणाले की, कोणत्याही संशयिताला अटक करण्यात येते तेव्हा सर्वच संबंध तपासले जातात. आताही सर्व संबंधाचा तपास होईल. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांनी केली आहे याकडे लक्ष वेधता केसरकर म्हणाले की, पोलिसांनी कोणत्याही संस्थेचे नाव घेतलेले नाही. संस्थेचा संबंध आढळून आला तरच बंदीचा प्रश्न उद्भवतो.