दापोडीत पैसे न दिल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कॅब चालकावर कोयत्याने वार

112

दापोडी, दि. ७ (पीसीबी) – सुट्टे पैसे आणतो असे सांगून परत न आलेल्या एका ग्राहकाकडे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कॅब चालकाला तिघा जणांनी मिळून कोयता आणि बॅटने जबर मारहाण केली. तसेच त्याचा मोबाईल फोडून नुकसान केले. ही घटना शुक्रवार (दि.५) रात्री साडेआठच्या सुमारास दापोडीतील तिलक रेस्टॉरेंटच्या बाजुलेल्या असलेल्या यश सहकारी गृहसंस्थेमध्ये घडली.

गणेश धोंडीबा सोनटक्के (वय २७, रा. तरवडेवस्ती, हडपसर) असे जखमी कॅब चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन तोंडओळखीच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गणेश हे कॅबचालक आहेत. शुक्रवारी रात्री ते तोंडओळखीच्या माणसाला दापोडीतील तिलक रेस्टॉरेंटच्या बाजुलेल्या असलेल्या यश सहकारी गृहसंस्थेमध्ये सोडण्यासाठी गेले होते. यावेळी तो माणूस सुट्टे पैसे घरुन घेऊन येतो असे सांगून परतलाच नाही. यावर गणेश त्याच्या घरी गेले. त्या घरातून सुरुवातील दोघेजण बाहेर आले आणि, “जब गाडी चला रहा था तब तुने फोन पे बात क्यु किया?”, असे बोलून गणेशला हाताने आणि बॅटने मारहाण केली. तसेच जो व्यक्ती कॅबमध्ये आला होता. त्याने कोयत्याने गणेशच्या हातावर वार केला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. भोसरी पोलिस तपास करत आहेत.