दापोडी येथे एका इसमाला परदेशी डॉलर देतो असे सांगून चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २२ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दापोडी येथील काटे बंगला समोरील भोसले कंट्री बार येथे घडली.

विक्रम शर्मा (वय २७, रा. विमाननगर, पुणे) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रफिक हलिम हुसेन (वय २७), मोहम्मद दिलावर मोहम्मद शहा शेख (वय २५, दोघेही रा. नजीर गल्ली, येरवडा) या दोघांना अटक करण्यात आली असून इतर दोघे फरार आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम शर्मा यांना २२ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान फोनवरील दोन अनोळखी इसमांनी तुम्हाला परदेशी डॉलर देतो असे सांगून गुलाबनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काटे बंगला समोरील भोसले कंट्री बार, दापोडी येथे बोलवून घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. मात्र त्यांना परदेशी डॉलर न देता त्यांना चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक केली. याप्रकरणी रफिक हलिम हुसेन, मोहम्मद दिलावर मोहम्मद शहा शेख दोघांना भोसरी पोलीसांनी अटक केली असून इतर दोघेजन फरार आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.