दहीहंडीला मी पुण्यात नव्हतो, तरीसुध्दा गुन्हा का दाखल केला आहे – संतोष जुवेकर    

3032

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – पुण्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमाला मी उपस्थित नव्हतो. तरीसुद्धा माझ्याविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला आहे, असा सवाल अभिनेता संतोष जुवेकर यांने केला आहे. दहीहंडीच्या दिवशी मी दिवसभर माझ्या ठाण्यातील घरी होतो. पुण्यात मी गेलोच नव्हतो. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी किमान शहानिशा तरी करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया जुवेकर यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात संतोष जुवेकरसह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जुवेकर यांनी खुलासा केला आहे.

अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाकडून मला आमंत्रणदेखील नव्हते. तसेच त्यांनी माझ्या परवानगीविना मंडळाच्या बॅनरवर माझा फोटो वापरला. याबद्दल मीच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला हवी. माझ्या वकीलांशी बोलून या प्रकरणात पुढे योग्य ते पाऊल उचलणार असल्याचे जुवेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जुवेकर पुण्यातील दहिहंडी कार्यक्रमाला आलेच नसतील, तर गुन्ह्यातून त्यांचे नाव वगळण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.