दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने गौरव

233

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकून इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या तीन विद्यार्थ्यांचा जिजाई प्रतिष्ठान आणि ‘पीसीबी’च्या वतीने गौरव करण्यात आला. महापालिकेच्या प्रोत्साहन योजनेतून यंदा तीन विद्यार्थी एक लाखाचे मानकरी ठरले आहेत.   

नुकताच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात महापालिकेच्या पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक  विद्यालयाचा निवृत्ती लक्ष्मण साखरे याने ९३.८० टक्के, तर त्याच शाळेचा प्रथमेश शहाजी जाधव याने ९३.२० टक्के आणि थेरगाव माध्यमिक विद्यालयाचा राज उद्य गिरी याने ९३.४० टक्के मिळवीत ‘लखपती’ होण्याचा मान मिळविला आहे.

या तीन विद्यार्थ्यांशी ‘पीसीबी’ने संवाद साधून त्यांचा गौरव केला.  तिन्हीही विद्यार्थी मध्यमवर्गातील असून महापालिकेच्या शाळेत शिकून इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत महापालिकेच्या प्रोत्साहन योजनेतून दिल्या जाणाऱ्या १ लाख बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत.

महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुमार असते. त्यामुळे पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळेत दाखल करतात. कोचिंग क्लासेसवर अनाठायी खर्च करतात. मात्र, या तिन्ही विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शाळेत शिकून मेरीटमध्ये येऊन महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता नसते, हा गैरसमज खोडून काढला आहे. महापालिकेच्या शाळांतही शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. येथेही चांगले शिक्षण दिले जाते. हे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन अधोरेखित केले आहे.

WhatsAppShare