दहावीच्या अभ्यासक्रमात आता जीएसटीसह म्युच्युअल फंड आणि एसआयपीचेही धडे

71

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करतांना कॅशलेश व्यवहारांबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच आर्थिक गुंतवणुकीबाबत पायाभूत माहिती व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. शेअर बाजार म्हणजे नेमके काय, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी, जीएसटी करप्रणाली काय आहे, याबाबतचे धडे दहावीच्या पाठयपुस्तकातून मिळणार आहेत. त्यासाठी बालभारतीने दहावीच्या गणिताच्या पुस्तकात या विषयांचा समावेश केला आहे.

नोटाबंदीनंतर म्युच्युअल फंड, एसआयपीमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र नागरिकांना म्युच्युअल फंड अथवा एसआयपीमध्ये गुंतवणूक कशी करावी, जीएसटीबाबतही पुरेशी माहिती नाही. याचा विचार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातच ही पायाभूत माहिती व्हावी, तसेच गुंतवणुकीसंदर्भात तोंडओळख व्हावी या उद्देशाने दहावीच्या गणित विषयात यंदा जीएसटीच्या धड्याचा समावेश करण्यात आला आहे.

शालेय जीवनापासूनच बचत व गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी फंड, शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्डस, मुदत देव, रिकरिंग खाते, विविध प्रकारच्या विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, स्थावर मालमत्ता असे विविध गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत ओळख व माहिती होण्याचा दृष्टीने याचाही अभ्यासात समावेश आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली जीएएसटी संकल्पना अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगण्यात आली आहे. याबरोबरच जीएसटीची विविध उदाहरणे देऊन स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जीएसटी नंबर कसा तपासावा, राज्याचा जीएसटी सांकेतिक क्रमांक याबाबतही माहिती देण्यात आली आहे.