‘दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात’; मनसेचा खरमरीत सवाल

41

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात, असा सवाल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमी मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मात्र, आता या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरुन मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. “षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? शिवसैनिक 50 टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही? इतकंच होतं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत? नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांचा मेळावा राजकीय अजेंड्यापेक्षा मोठा आहे हे यांना लक्षातच येत नाही का?”, असा घणाघात अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील”. “यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे” असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

WhatsAppShare