दलितेतर लोकांनी आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा – भाजपा आमदार

257

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूद कायम ठेवणारे विधेयक संसदेत मंजूर झाले असतानाच उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. दलितेतर समाजाने आगामी निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करुन निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दलित अत्याचारविरोधी कायद्यातील (अॅट्रॉसिटी अॅक्ट) मूळ तरतूद कायम करणारे विधेयक संसदेत नुकतेच मंजूर झाले. तर दुसरीकडे भाजपाचे उत्तर प्रदेशमधील बरैयातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘समाजाची प्रतिष्ठा आणि हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. जनतेने मला यासाठीच निवडून दिले आहे. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि संविधानाच्या विरोधात आहे. एखाद्या व्यक्तीला चौकशीविनाच तुरुंगात कसे टाकता येईल?, या सुधारित विधेयकाविरोधात मी लवकरच मोहीम सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी दलितेतर समाजाला आवाहन करतो की त्यांनी आरक्षित जागांवर नोटाचा वापर करावा. दलित स्वत:च्या पाठिंब्यावर कुठे जाऊ शकतात हे आपण बघूया, असेही त्यांनी म्हटले आहे.