“दरेकर माफी मागा नाहीतर आम्ही महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाडही रंगवू शकतो”: रुपाली चाकणकरांचा इशारा

54

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरेकर माफी मागा. नाही तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.प्रविणजी दरेकर, तुम्ही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहात. हे सभागृह वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. परंतु आपण आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं यावरून तुमचा वैचारिकतेशी अभ्यासाशी काहीही संबंध नसल्याचं दिसून येतं. तुम्ही जे वक्तव्य केलं ते उच्चारताना मला लाज आणि संकोच वाटतो. पण घेणं नाईलाज आहे. तुम्ही म्हणालात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. तुम्ही महिलांबद्दल असं बोलत आहात. सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकते. त्यातून तुमच्या वैचारिक दारिद्रय दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलं. तुमच्या पक्षातील काही महिला आम्ही महिलांच्या किती कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आज मला त्यांची कीव वाटते. ज्या पक्षाचा असला विचार आहे, अशा पक्षात या महिला काम करत आहेत. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृतीही दिसून येते. प्रविणजी दरेकर, तुम्ही या विधानबद्दल माफी मागावी. नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाडही रंगवू शकतो, याची जाणीव ठेवावी, असा इशारा चाकणकर यांन दिला आहे.

WhatsAppShare