दरेकरांच्या वक्तव्याने भाजपच्या नाकीनऊ; पाटील सारवासारव करत म्हणाले, ‘त्यांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता’

86

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माफीची मागणी करत गाल रंगवण्याचा देखील इशारा दिला आहे. या सगळ्या प्रकारानंतर भाजपची मात्र चांगलीच गोची झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दरेकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, असं म्हणत चंद्रकांतदादांनी सारवासारव केली आहे.

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 16 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची राज्यात जोरदार चर्चा आहे. काल पुण्याच्या शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

“प्रविण दरेकर जे वाक्य बोलले ते बोलीभाषेत वापरलं जातं. त्याचा एवढा इश्यू करण्याची गरज नाहीय. आपण दररोजच्या बोलण्यात वाक्यप्रचार वापरत असतो. त्यामुळे उगीच पराचा कावळा करु नये. त्याचा अर्थ वेडावाकडा घेऊ नये. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“दरेकरांच्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीला श्रीमंतांचा पक्ष म्हणत गोरगरिबांची कीव वाटत नसल्याचं म्हटलं. राष्ट्रवादी पक्ष कसा श्रीमंतांचा, सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकावाल्यांचा, हे दरेकरांनी भाषणात सांगितलं आणि त्याच्या पुढे जाऊन तो वाक्यप्रचार वापरला. त्यात एवढा इश्श्यू करण्यासारखं काही नाही”, असं चंद्रकांतदादा म्हणाले.राष्ट्रवादीला श्रीमंतचं जवळचे वाटतात गरिब नाही, असा निशाणा साधत प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता तो काढण्याचा कुणी प्रयत्न करु नये, असंही चंद्रकांत दादा म्हणाले. पण राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपच्या नेत्यांना मात्र दरेकरांच्या वक्तव्यावर सारासारव करणाऱ्या प्रतिक्रिया द्याव्या लागतायत, एवढं मात्र खरं…!

प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला.

राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.

दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

WhatsAppShare