थेरगाव, डांगे चौक येथे ग्रेडसेप्रेटर उभारा; आमदार लक्ष्मण जगतापांची अधिकाऱ्यांना सूचना

79

थेरगाव येथील डांगे चौकात वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. याठिकाणी वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी डांगे चौकात ग्रेडसेप्रेटर उभारण्याची भाजपचे शाहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिकाऱ्यांना सोमवारी (दि. १२) सूचना केली.

आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यालयात  अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड उपस्थित होते.

चिंचवड ते वाकड या दरम्यान वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. विशेषतः थेरगाव येथील डांगे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

अधिकाऱ्यांनी डांगे चौक ग्रेड सेपरेटर उभारण्याचा आराखडा तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार एकूण ४६० मीटर लांबीचा ग्रेडसेपरेटर उभारण्यात येणार आहे. भुमकर चौक वाकड बाजूने २२४ मीटर, तर चिंचवडच्या बाजुने १७५ मीटर लांब असेल. ग्रेडसेपरेटरची रुंदी १५.५० मीटर इतकी राहील. दोन्ही बाजूने ये-जा करण्यासाठी ७ मीटर रुंद लेन असेल. त्याची उंची ५.५० मीटर राहील. या कामाचा आराखडा पुन्हा तपासून त्यावर कार्यवाही करावी. सेवावाहिन्यांसह संपूर्ण चौकातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात यावे, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त हर्डीकर व संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.