थेरगावात हॉर्न वाजवल्याच्या रागातून टोळक्यांकडून ट्रफिक वॉर्डनच्या कारची तोडफोड; दुचाकीही दिली पेटवून

134

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – हॉर्न वाजवल्याच्या रागातून टोळक्यांनी पाठलाग करून एका ‘ट्रॅफिक वॉर्डन’च्या कारची तोडफोड करत रस्त्यावरील एक दुचाकी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२७) रात्री उशीरा एकच्या सुमारास थेरगावातील इंद्रायणी नगर येथे घडली.

याप्रकरणी  ट्रॅफिक वॉर्डन बालाजी किसन सगर (३८,रा.इंद्रायणी नगर , थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी त्यानुसार सागर सातपुते नावाच्या तरुणासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा एकच्या सुमारास फिर्यादी बालाजी सगर हे त्यांच्या कारने घरी निघाले होते. यावेळी थेरगाव येथील इंद्रायणी नगर मध्ये  रस्त्याच्या मधोमध सातपुते हा मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावर सगर यांनी हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले यावेळी सगर आणि सातपुते यांच्यात वाद  झाला. यावर चिडलेल्या सातपुते याने त्याच्या तिन साथीदारांसोबत सगर यांच्या कारचा पाठलाग करीत गाडीवर दगडफेक केली. यावर घाबरलेले सगर यांनी कार जागेवर सोडून पळ काढला. तर चिडलेल्या टोळक्याने कारची तोडफोड केली तसेच रस्त्याच्या कडेला उभी असलेली एख दुचाकी देखील पेटवून दिली.  पोलिसांनी  आरोपी सागर सातपुतेला अटक केली असून त्याचे इतर तीन साथीदार अद्याप फरार आहेत. वाकड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.