थेरगावात तिघा भावांसह एकावर चाकूने वार

1168

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – परिसरात जोराने गाडी चालवण्यावरुन झालेल्या वादातून तिघा भावांसह भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या एकावर चाकूने वार करण्यात आले आहेत. या घटनेमध्ये चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री नऊच्या सुमारास थेरगावातील संभाजीनगर येथे घडली.

प्रितम जयरलींद्र अडसूळ (वय २४), प्रेम जयरवींद्र अडसूळ (वय २७), संदीप अडसूळ आणि केरबा मगर असे चाकूचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार अनिकेत हरीचंद्र काळे, रवींद्र जगदीश पोखरकर, हर्षीकेश हरेराम पांचाळ, आदेश दिलीप बालवडकर आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास संदीप अडसूळ हा तरुण थेरगावातील संभाजीनगर येथील त्यांच्या घराजवळ उभा होता. यावेळी आरोपी आदेश हा दुचाकीवरुन जोरात गेला. यामुळे संदीपने अनिकेतला गल्लीत गाडी जोराने चालवू नोको येथे ‘रहदारी आहे, लहान मुले येथे खेळत असतात यामुळे अपघात होऊ शकतो असे समजवले’. काही वेळाने आरोपी अनिकेतने संदीपला बोलावून घेऊन त्याच्यासोबत भांडण सुरु केले. हे कळताच संदीपचे दोघे भाऊ प्रेम, प्रितम आणि मित्र केरबा तेथे पोहचे त्यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. चौघांनाही चिंचवड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना तातडीने अटक केली असून त्यातील एक जण अल्पवयीन आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.