थेरगावमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाची चौकशी होणार; धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून निरीक्षकांची नियुक्ती

79

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मोफत उपचारांसाठी पात्र रुग्णाला उपचाराचे पैसे दिले नाहीत म्हणून माणुसकीहिन वागणूक देत डांबून ठेवणाऱ्या आदित्य बिर्ला रुग्णालयातील या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होणारा आर्थिक दुर्बल घटकांतील गरीब रुग्ण मोफत उपचारास पात्र नसेल, तर त्याबाबत संबंधित रुग्ण व त्याच्या नातेवाइकाला न कळविता उपचार नाकारू नयेत. त्याबाबतचा अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाला सादर करावा. तसेच गरीब रुग्णांवरील मोफत उपचार योजनेची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या नावात धर्मादाय किंवा चॅरिटेबल असा उल्लेख करण्याबाबत आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आदित्य बिर्ला रुग्णालयाला फटकारले आहे.