थेरगावमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाची चौकशी होणार; धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून निरीक्षकांची नियुक्ती

348

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मोफत उपचारांसाठी पात्र रुग्णाला उपचाराचे पैसे दिले नाहीत म्हणून माणुसकीहिन वागणूक देत डांबून ठेवणाऱ्या आदित्य बिर्ला रुग्णालयातील या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होणारा आर्थिक दुर्बल घटकांतील गरीब रुग्ण मोफत उपचारास पात्र नसेल, तर त्याबाबत संबंधित रुग्ण व त्याच्या नातेवाइकाला न कळविता उपचार नाकारू नयेत. त्याबाबतचा अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाला सादर करावा. तसेच गरीब रुग्णांवरील मोफत उपचार योजनेची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या नावात धर्मादाय किंवा चॅरिटेबल असा उल्लेख करण्याबाबत आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आदित्य बिर्ला रुग्णालयाला फटकारले आहे.

थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय आहे. हे रुग्णालय शासनाचे विविध फायदे लाटत आहे. त्यामुळे या रुग्णालयाने कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास त्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. परंतु, बाहेरून पंचतारांकित वाटणारे आदित्य बिर्ला रुग्णालय गरीब रुग्ण उपचारासाठी आल्यास त्यांना हाकलून लावते. धक्कादायक बाब म्हणजे उपचारानंतर बिल न दिल्यास संबंधित रुग्णाला अक्षरशः डांबून ठेवून माणुसकीहिन वागणूक देते. गेल्या महिन्यात रुग्णालयाच्या या माणुसकीहिनतेमुळे पिंपरी येथील दशरथ आरडे या ७२ वर्षांच्या वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला. उपचाराचे बिल दिले नाही म्हणून रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी आरडे यांना दहा दिवस डांबून ठेवले होते.

शहरातील काही संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांमार्फत आरडे यांची सुटका करून अन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात रेखा दुबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व प्रकरण पोलिसांनी हाताळूनही दुबे यांची मुजोरी कायम आहे. आरडे यांचे प्रकरण मला माहितच नव्हते. तसेच पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णाला पळवून नेल्याचे सांगत रेखा दुबे यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. त्यामुळे शहरातील सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १०) पुण्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात आंदोलन केले. तसेच थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुजोरीपणाविरोधात कारवाईचे लेखी आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

त्यानंतर धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील रुग्णालय शाखेच्या अधीक्षकांनी पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भारत मिरपगारे यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामध्ये दशरथ आरडे यांना उपचाराच्या बिलासाठी डांबून ठेवणे व त्यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी निरीक्षकांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे. चौकशी अहवाल येताच आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनावर फौजदारी किंवा तत्सम स्वरुपाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही लेखी आश्वासनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे रुग्णालय शाखेच्या अधीक्षकांनी सोमवारी (दि. १०) दिलेल्या लेखी आदेशात आदित्य बिर्ला रुग्णालयाने नावापुढे धर्मादाय किंवा चॅरिटेबल असा उल्लेख न केल्याबद्दल रुग्णालयाला फटकारले आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटक तसेच गरीब रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात केल्या जाणाऱ्या उपचारांबाबतच्या योजनेची माहिती देणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार घेण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यास तो अशा स्वरुपाच्या उपचारांसाठी पात्र नसल्यास त्याबाबत संबंधित रुग्णास अथवा त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात यावे. तसेच त्याचा अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाला सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे.