थेरगावच्या आदित्य बिर्ला रुग्णालयाला धर्मादाय आयुक्तांचा दणका; नावापुढे “धर्मादाय” शब्द लावण्याचे आदेश

2019

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – शासनाचे सवलती आणि फायदे लाटूनही गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या आणि उपचाराचे बिल न दिल्यास डांबून ठेवणाऱ्या थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाला अखेर धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाला आपल्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरीला चाप बसणार आहे. दरम्यान, धर्मादाय रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी किती खाटा उपलब्ध आहेत आणि किती रुग्ण दाखल आहेत, याबाबतचा माहिती फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात दररोज लावण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी अद्याप कोणताच आदेश न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

थेरगाव येथे आदित्य बिर्ला रुग्णालय दिमाखात उभी राहिली आहे. बाहेरून चकचकीत पंचतारांकित हॉटेलसारखे दिसणाऱ्या या रुग्णालायचे आतले खरे रूप वेगळेच आहे. त्यामुळे हे रुग्णालय सुरू झाल्यापासून कायम वाद्ग्रस्त राहिले आहे. हे रुग्णालय उभे करण्यासाठी शासनाच्या सवलती आणि फायदे लाटण्यात आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारित येते. शासनाचे फायदे लाटलेले असल्यामुळे आदित्य बिर्ला रुग्णालयात गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार होणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, या रुग्णालयाने कायदा फाट्यावर मारून गोरगरीब रुग्णांची लूट चालविली आहे.

गेल्या महिन्यात पिंपरी येथील दशरथ आरडे या ७२ वर्षांच्या वयोवृद्ध रुग्णाला अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे उपचारासाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते आर्थिक दुर्बल घटकांतील असल्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर मोफत उपचार होणे आवश्यक होते. परंतु, उपचाराचे बिल न दिल्यामुळे या वयोवृद्ध रुग्णाला आदित्य बिर्ला रुग्णालायाच्या मुजोर प्रशासनाने दहा दिवस अक्षरशः डांबून ठेवले होते. त्यांच्यावरील औषधोपचार बंद करून त्यांना जेवणही दिले जात नव्हते. रुग्णाच्या नातेवाइकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय ते पोलिसांपर्यंत धावाधाव केल्यानंतर वाकड पोलिसांनी स्वतःहून रुग्णालयात जाऊन रुग्णाची सुटका केली. त्यानंतर या वयोवृद्ध रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने या रुग्णाचा तेथे मृत्यू झाला.

रुग्णाला डांबून ठेवणाऱ्या रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांच्यासह अन्य जबाबदार व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. परंतु, माणुसकी नावाची गोष्ट न मानणाऱ्या आणि असंवेदनशील रेखा दुबे यांच्या मुजोरपणामुळे दहा दिवस उपचार न मिळाल्याने एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला. या घटनेला पोलिसांनी अद्याप कोणालाही जबाबदार धरलेले नाही. आदित्य बिर्ला रुग्णालय बड्या धेंड्यांचे असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण कदाचित दाबून टाकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित दशरथ आरडे यांचा मृत्यू मेडिकलच्या भाषेत नैसर्गिक मृत्यूही दाखवला गेला असेल. परंतु, या घटनेमुळे आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या आतमध्ये सुरू असलेली काळी बाजूही समोर आली.

दशरथ आरडे प्रकरणावरून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयालाच्या कारभाराविरोधात आवाज उठविला. त्यामुळे किमान रुग्णाला डांबून ठेवल्याचा गुन्हा तरी दाखल झाला. त्यानंतर या सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बड्या धेंड्यांना पाठीशी घालणारे जिल्हा प्रशासन थोडे तरी हलल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे आदित्य बिर्ला रुग्णालयाला आपल्या नावापुढे धर्मादाय या शब्दाचा वापर करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाला आपल्या नावापुढे धर्मादाय या शब्दाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, शासनाचे फायदे लाटणाऱ्या या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी किती खाटा राखीव आहेत. तसेच त्यातील किती खाटांवर गोरगरीब रुग्ण दाखल आहेत, याबाबत माहिती देणारे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात दररोज लावणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रुग्णालयाला सक्ती करण्याची मागणीही शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली होती. परंतु, त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्त या बड्या रुग्णालयाला पाठीशी घालत असल्याचे म्हटले आहे. परिणामी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा शहरातील सामाजिक कार्यकर्ते लवकरच आंदोलन करणार असल्याचे अजिज शेख यांनी सांगितले.