थापा मारणाऱ्यांना चाप लावण्यासाठी व्हिडिओ क्लीप दाखवतोय – राज ठाकरे

112

सातारा, दि. १७ (पीसीबी) – जनतेला खोटी आश्वासने देणाऱ्यांना  उघडे पाडण्यासाठी मी सभा घेत आहे. थापा मारणाऱ्यांना चाप लावण्यासाठीच मी जाहीर भाषणांमध्ये व्हिडिओ क्लीप दाखवत आहे. गेल्या  पाच वर्षात जे पूर्ण झाले नाही, ते आता मी चव्हाट्यावर मांडणार आहे. निवडणूक लढवत नसलो तरी अन्यायावरच मी बोलणार,  अशी ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आज (बुधवार) येथे घेतली.

नांदेड, सोलापूर, इचलकरंजीनंतर राज ठाकरे यांची आज साताऱ्यात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी   मोदी-शहा यांच्यावर  तोफ डागली.

राज म्हणाले की, ज्या प्रमाणे मुघलांविरोधात लढण्यासाठी सर्वात आधी शिवाजी महाराजांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातून आवाज निघाला होता. तसाच आवाज मोदी-शहांविरोधात आवाज सर्वप्रथम महाराष्ट्रातून निघणार नाही तर कुठून निघणार?  माझ्यासाठी शिवाजी महाराज प्रेरणास्थानी आहेत.

देशातील एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायला पंतप्रधान तयार नाहीत. मोदींनी बहुतांश मीडिया देखील मॅनेज केला आहे. पत्रकारांसमोर येऊन बोलायला मोदी घाबरतात. मोदींनी जनतेला जी स्वप्ने दाखवली त्यावर मोदी एकही शब्द बोलत नाहीत. उलट ते पुलवामा आणि एअर स्ट्राईक बद्दल बोलतात. निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही ही गोष्ट घडवलीत का? असा सवालही त्यांनी पुन्हा एकदा केला.