थांबा, कोरोनाची दुसरी लाट येणार ?

0
455

जिनिव्हा, दि. २६ (पीसीबी) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाउन हटवण्याचा निर्णय अनेक देश घेत असून जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. लॉकडाउन हटवण्यात घाई केली तर करोनाचा दुसरा सर्वोच्च टप्पा येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी सांगितलं आहे की, “काही देशांमध्ये करोनाची प्रकरणं कमी होत असली तर मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथे ही संख्या वाढत आहे. सध्या जग करोनाच्या पहिल्या लाटेत असून कोणत्याही क्षणी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने ठाम राहणं गरजेचं आहे”.

हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ५० लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. ज्या देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यांना इशारा देताना माइक रायन यांनी करोना टप्प्याटप्प्याने येत असल्याचा इशारा दिला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिका जिथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन करोनाची दुसरी लाट टाळता येईल असं ते म्हणाले आहेत.

“करोना कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा वाढू शकतो. करोनाची प्रकरणं कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव आता कमी होत जाईल आणि आपल्याकडे दुसरी लाट येण्याआधी तयारीसाठी खूप वेळ आहे असा विचार करणं चुकीचं ठरेल. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एका महिन्यात तो पुन्हा वाढू शकतो,” असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.