‘त्या’ विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होणार ?

0
557

पुणे, दि. १३ (पीसीबी) – माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने दीडशे दाम्पत्यांना मुले झाली आहेत. तसेच ज्यांना मुलगा हवा होता, त्यांना मुलगाच झाला, असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्याविरूध्द पीसीपीएनडीटी (गर्भलिंग निदान व प्रसवपूर्व कायदा) कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. कारण भिडे यांच्या विधानाची  राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने दखल घेतली असून त्यांच्या विधानाची चौकशी करण्याचे आदेश नाशिक महापालिकेला दिले आहेत.  

संभाजी भिडे यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाकडे तक्रार केली होती. त्याची कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. भिडे यांच्या विधानाची चौकशी करून त्यांच्या भाषणाची सीडी तपासण्यात यावी. त्यात  तथ्य आढळल्यास पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी महापालिकेला दिले आहेत.

दरम्यान, पीसीपीएनडीटी कायद्यानुसार भिडे यांच्याविरोधात कलम २२ नुसार न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो. कायद्यानुसार महापालिकेच्या पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याला अशा प्रकरणी खटला दाखल करण्याचे अधिकार आहेत.