‘त्या’ विधानाप्रकरणी भिडे गुरूजींना नाशिक महापालिकेची नोटीस

84

नाशिक, दि. २७ (पीसीबी) – माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली, असे विधान केल्याप्रकरणी  शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना आरोग्य विभागाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भिडे यांनी ती आंब्याची झाडे किती आणि कुठे आहेत, तुम्ही दिलेले आंबे खाल्ल्याने ज्या दांपत्यांना मुलगे झाले, त्यांची नावे व पत्ते द्यावेत, असे त्यात म्हटले आहे. सात दिवसांच्या आत भिडे यांना त्यांच्या या विधानाचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक येथील एका सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले झाल्याचे खळबळजनक विधान केले होते. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल, असेही विधान त्यांनी केले होते. त्यामुळे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार दाखल केली होती.