‘त्या’ लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी अखेर एका ब्रिगेडियर विरुद्ध गुन्हा

86

पुणे, दि.१७ (पीसीबी) : एका लेफ्टनंट कर्नल महिलेने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी लष्करातील एका ब्रिगेडियर विरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ब्रिगेडियरने या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येची घटना दि. 13 सप्टेंबर सकाळी उघडकीस आली होती.

सुपिरियर ऑफिसर ब्रिगेडियर अजित मिलू (रा. ब्रिगेडियर जनरल स्टाफ हेडक्वार्टर, आर्मी ट्रेनिंग कमांड, सिमला, हिमाचल प्रदेश) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिला अधिकाऱ्याच्या 43 वर्षीय पतीने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 42 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेने आत्महत्या केली होती. त्यांना 17 वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे वडील निवृत्त कर्नल आहेत. मागील काही वर्षांपासून आत्महत्या केलेल्या महिलेचे पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू होते. यासंदर्भात त्यांनी न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी देखील अर्ज दाखल केला होता.

आरोपी ब्रिगेडियरने या महिला लेफ्टनंट कर्नल सोबत प्रेमाचे नाटक करून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्याशी संबंध ठेवले. त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी देण्यात आली. या धमकीला घाबरून या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या पतीने दिल्याचे सांगण्यात आले आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लेफ्टनंट कर्नल महिलेने मोबाईल समोर ठेवला होता. या मोबाईलची देखील तपासणी अद्याप सुरू आहे. महिला लेफ्टनंट कर्नल पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. यातील तीन महिने त्यांचा प्रशिक्षण काळ पूर्ण झाला होता. त्यांना राहण्यासाठी ऑफिसर्स मेसमध्ये वन बीएचके क्वॉर्टर्स देण्यात आले होते. तेथेच त्यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे उघडकीस आले होते.

WhatsAppShare